पुणे : यंदा जानेवारीतील कमाल तापमानाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. बुधवारी शिवाजीनगर येथे नोंदवले गेलेले ३५.९ अंश सेल्सियस हे शहराच्या आजवरच्या इतिहासातील जानेवारीतील सर्वाधिक तापमान ठरले असून, डिसेंबरपाठोपाठ जानेवारीमध्येही कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे.

यंदाच्या थंडीच्या हंगामातील काही कालावधीपुरती राहिलेली कडाक्याची थंडी वगळता सातत्याने हवामान चढउतार होत आहेत. डिसेंबरमध्येही संमिश्र हवामान होते. त्यानंतर जानेवारीमध्येही थंडी, ढगाळ असेच वातावरण राहिले. त्यामुळे जानेवारीचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. गेल्या दहा वर्षांत जानेवारीतील कमाल तापमान साधारणपणे ३० ते ३४ अंश सेल्सियस दरम्यान राहिले आहे. त्यात २०१६मध्ये ३४.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. तर गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक तापमानाच्या आकडेवारीचा अंदाज घेतला असता २००९मध्ये ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले होते. त्यात २७ जानेवारी २००९ रोजी ३५.३ अंश सेल्सियस, २६ जानेवारी २००९ रोजी ३५.२ अंश सेल्सियस तापमान होते. या पार्श्वभूमीवर, बुधवारी शिवाजीनगर येथे जानेवारीतील आजवरचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याने जानेवारीमध्ये उकाडा सहन करावा लागला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणारे थंड वारे खंडित झाल्यामुळे जानेवारीमध्ये शहरातील थंडी कमी झाली. तसेच प्रती चक्रवात प्रणालीमुळे तापमानात वाढ झाली. परिणामी, जानेवारीचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. विशेषत: बुधवारी शिवाजीनगर येथे नोंदवले गेलेले ३५.९ अंश सेल्सियस पुणे शहरातील जानेवारीतील आजवरचे सर्वाधिक तापमान आहे.