पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील भोसलेनगर परिसरात बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून ३३ लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा याच परिसरात घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी सदनिकेतून १७ लाख ४५ हजार रुपयांचे ८५ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. याबाबत चैत्राली हर्षद भागवत (वय ३२, रा. फाईव्ह शेनशाई सोसायटी, अशोकनगर, भोसलेनगर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भागवत २५ नोव्हेंबर रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी भागवत यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून १७ लाख ४५ हजार रुपयांचे ८५ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. दोन दिवसांपूर्वी भागवत परतल्या. तेव्हा सदनिकेचे कुलुप तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.

हेही वाचा : नवले पूल परिसरात पुन्हा अपघात; टेम्पो उलटून एकाचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी भोसलेनगर परिसरात बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात चोरी झाल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत बांधकाम व्यावसायिक दीपक विलास जगताप (वय ५२, रा. मिथिला बंगला, अशोकनगर, गणेशखिंड रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती जगताप यांच्या बंगल्यात मध्यरात्री चोरटा शिरला. स्वयंपाकघराची खिडकी सरकवून चोरट्याने बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्याने हिरेजडीत सोन्याचे दागिने, रोकड असा ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरला. भोसलेनगर परिसरात घरफोडीच्या दोन घटना घडल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत.