पुणे : मतिमंद मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या परप्रांतीय तरूणाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश डी. के. अनुभुले यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
दीपक सुधीर मंडल (वय २८, मूळ रा. आसाम) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस. ए. शिंदे यांनी याप्रकरणाचा तपास करुन आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार एस. ए. माने यांनी सहाय केले.
७ ऑक्टोबर २०२१ रोजी मतिमंद मुलगी ओट्यावर बसली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले. मुलगी घाबरून घरात पळाली. तिने खाणाखुणांद्वारे या घटनेची माहिती आईला दिली. आई घरातून बाहेर आली. तिला पाहताच आरोपी मंडल पसार झाला. मुलीच्या वडिलांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
न्यायालयात रडू कोसळले
अश्लील कृत्य करणारा आरोपी दीपक मंडल याला मतिमंद मुलीने न्यायालयात ओळखले. त्याला पाहताच मुलीला रडू कोसळले. मुलगी संवाद साधू शकत नाही. खाणाखुणांद्वारे ती संवाद साधते. तिचा जबाब पोलिसांनी कलम १६४ नुसार नोंदविला होता. न्यायालयाने खाणखुणा करुन तिने आरोपीला ओळखले. या सर्व बाबी विशेष न्यायालायने नोंदवून घेतल्या होत्या. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन आरोपीला न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.