पुणे : मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

दीपाली युवराज सोनी (वय २९) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक शौकतअली पापलाल कुलकुंडी (वय ५१) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार जगदीश आणि सहप्रवासी दीपाली हे बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास गंगाधाम चौकातील सिग्नलला थांबले होते. दुचाकीच्या मागे ट्रक होता. सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीस्वार जगदीश निघाले. त्या वेळी पाठीमागून ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली दुचाकी अडकली. चाकाखाली सापडून दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला.

अवजड वाहतूक बंदीचे आदेश कागदावर

शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. वाहतूक पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन शहरात येणारे ट्रकचालक, डंपरचालक, टँकरचालक उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या समन्वयातून वाहतूक विषयक सुधारणा करण्यात येत आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या अवजड वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.

गंगाधाम चौक धोकादायक

गंगाधाम ते बिबवेवाडीतील आई माता मंदिर दरम्यान तीव्र उतार आहे. गंगाधाम चौक गजबजलेला आहे. मार्केट यार्डात येणारी वाहने या मार्गाचा वापर करतात. यापूर्वी गंगाधाम चौकात गंभीर स्वरुपाचे अपघात झाले होते. गंगाधाम ते आई मंदिर रस्त्यावरील उतारावर सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वार सून आाणि सासू मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर या भागातील रहिवाशांनी वर्षभरापूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर गंगाधाम रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. बंदी आदेश झुगारून सर्रास अवजड वाहने या मार्गाचा वापर करत असल्याची माहिती गंगाधाम परिसरातील रहिवाशांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंधरा दिवसांत ११ जणांचे बळी

शहर परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत ११ जण मृत्युमुखी पडले. अवजड वाहनांच्या भरधाव वेगामुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे.