शिरूर : शिरूर लोकसभेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. अमोल कोल्हे हे तीन वर्षांपूर्वी राजीनामा देणार होते असे देखील त्यांनी म्हटले. आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना अजित पवार आव्हान देणार असून शिरूर लोकसभेसाठी तगडा उमेदवार देणार आहेत. तो निवडून आणणारच असा ठाम विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केलाय. या वक्तव्यानंतर भोसरीमधील माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे सर्वांची नजर गेली आहे. २०१९ च्या लोकसभेसाठी विलास लांडे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक होते, ऐनवेळी आताचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विलास लांडे अ‍ॅक्टिव्ह झाले असून अजित पवारांनी उमेदवारी दिल्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : “पुढच्या निवडणुकीत शिरुरमधून आमचाच उमेदवार…”, अजित पवार यांचे अमोल कोल्हेंना आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विलास लांडे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा पुन्हा राष्ट्रवादीकडे आणणार असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार हे नेहमीच त्यांच्या शब्दावर ठाम असतात. त्यामुळे ते शिरूर लोकसभा नक्कीच राष्ट्रवादीकडे आणतील. शिरूर लोकसभेसाठी तगडा आणि जिंकून येणारा उमेदवार देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंबंधी अजित पवारांशी मी चर्चा करणार असून शिरूर लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगणार आहे. २०१९ ला विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेची जोरदार तयारी केली होती. ऐनवेळी खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली. अजित पवारांनीच विलास लांडे यांना थांबण्यास सांगितलं असल्याचं बोललं जातं. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार हे विलास लांडे यांच्यावर विश्वास दाखवतील असं सांगितलं जात आहे. अजित पवारांच्या बोलण्याचा नेमका अर्थ हा विलास लांडेच्या दिशेनेच जातो हे मात्र नक्की.