पुणे : प्रेमसंबंधात झिडकारल्याने एकाने प्रेयसीवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना बाणेर भागातील कंपनीच्या आवारात शुक्रवारी घडली. नेम चुकल्याने तरुणी बचावली.
तक्रारदार तरुणी ‘एमबीए’ अभ्यासक्रम करत आहे. ती बाणेर भागातील एका खासगी कंपनीत प्रशिक्षण घेत आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास तरुणी कंपनीत निघाली होती. त्या वेळी आरोपीने तिला इमारतीच्या आवारात अडविले. आरोपीने घरपोहोच खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या ‘डिलिव्हरी बॉय’सारखा वेश परिधान केला होता. तरुणीला अडविल्यानंतर त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने बोलण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्याकडील पिस्तुलातून तरुणीच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्यानंतर तरुणी घाबरली. तिने आरडाओरडा केला. नेम चुकल्याने तरुणी बचावली. तरुणीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली.
आरोपी दुचाकीवरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपी तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी एका खासगी कंपनीत काम करतो. यापूर्वी त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवडमधील एका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित कंपनीचे कार्यालय एका जुन्या इमारतीत आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.
एकतर्फी प्रेमातून हल्ल्याच्या घटना
दोन वर्षांपूर्वी सदाशिव पेठेतील पेरूगेट चौकी परिसरात एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन तरुणीवर काेयत्याने हल्ला केला होता. दैव बलवत्तर होते म्हणून तरुणी बचावली होती. नागरिकांनी हल्ला करणाऱ्या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर पुण्यात स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ एकाने कटरने गळा चिरून खून केल्याची घटना घडली होती.