पुणे : दुचाकीवरुन अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एकाला खडक पोलिसांनी भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात पकडले. त्याच्याकडून पावणेदोन लाख रुपयांचे मेफेड्रोनसह दुचाकी जप्त करण्यात आली

कानिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पाेलीस नाईक आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायडू हा सराइत आहे. भवानी पेठेतील नेहरु रस्त्याव खडक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अलका जाधव, उपनिरीक्षक प्रल्हाद डेंगळे, हवालदार हर्षल दुडम, आशिष चव्हाण, इरफान नदाफ हे गस्त घालत होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास नायडू दुचाकीवरुन नेहरु रस्त्याने टिंबर मार्केटकडे निघाला होता. पोलिसांच्या पथकाने त्याला पाहिले. कासेवाडीकडे जाणाऱ्या एका गल्लीत तो दुचाकीवर थांबला होता. गल्लीत अंधार होता. दुचाकीवर वाहन क्रमांकाची पाटी नसल्याचे पोलिसांनी पाहिले.

पोलिसांनी त्याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. नायडूला पोलिसांनी पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे असलेल्या पिशवीत पावणेदोन लाख रुपयांचे ८ ग्रॅम मेफेड्रोन सापडले. जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत पावणेदोन लाख रुपये आहे. नायडू याच्याकडून मेफेड्रोनसह, २५ हजा रुपये, दुचाकी असा तीन लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.

अमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलीस आयुक्तांचे आदेश

शहरात अमली पदार्थ तस्करी, विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. कात्रजमधील आंबेगावमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोघांना नुकतेच पकडले. त्यांच्याकडून चार लाख २९ हजार रुपयांचा २९ किलो गांजा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी बिबवेवाडी, कोंढवा भागात कारवाई करुन २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले होते. बुधवार पेठेत फरासखाना पोलिसांनी एकाकडून मेफेड्रोन जप्त केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोंढवा भागात अफू बाळगणाऱ्या भागीरथराम रामलाल बिष्णोई (वय ४६, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ९८ हजारांची अफू जप्त करण्यात आली होती, तसेच बिबवेवाडी भागात अमली पदार्थ विरोधी विभागाने कारवाई करुन विठ्ठल ऊर्फ अण्णा रघुनाथ कराडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) याला अटक करुन त्याच्याकडून ११ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले. बुधवार पेठेत मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या संदीप सुकनराज जैन (वय ४२, रा. भुलेश्वर, मुंबई) असे अटक याला अटक करण्यात आली होती.