पुणे : सराइतांकडून व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. लष्कर भागातील एका दुकानदाराला धमकावून त्याच्याकडे दरमहा हप्ता मागितल्याप्रकरणी एका सराइताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच स्वारगेट भागात दूध विक्री करणाऱ्या तरुणाला धमकावून सराइताने हप्त्याची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लष्कर आणि स्वारगेट पोलिसांकडून सराइतांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात एका दुकानदाराला धमकावून त्याच्यकडून १५ हजार ८०० रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका सराइताला अटक करण्यात आली आहे. अरबाज मैनुद्दीन कुरेशी (वय २८, रा. भीमपूरा, लष्कर आणि राजेवाडी, नाना पेठ ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात दुकान आहे. आरोपी कुरेशीने त्यांना दरमहा हप्ता देण्याची मागणी करुन धमकाविले होते. या भागात व्यवसाय करायचा असेल तर दरमहा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी त्याने दिली होती. व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील १५ हजार ८०० रुपयांची रोकड कुरेशीने लुटली होती. कुरेशीच्या धमकीमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.

स्वारगेट भागात मसाला दूध विक्री करणाऱ्या तरुणाला गजाने मारहाण करुन त्याच्याकडे सराइताने हप्ता मागितल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी मंगेश पोकळे (वय ४०, रा. धायरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण गुरुवार पेठेतील खडकमाळ आळी परिसरात राहायला आहे.

तरुणाने स्वारगेट भागातील नटराज हाॅटेलजवळ जय गणेश मसाला दूध विक्रीची गाडी लावली आहे. २७ एप्रिल रोजी रात्री आरोपी पोकळे तेथे आला. मी धायरीतील मोठा गुंड आहे. या भागात व्यवसाय करायचा असेल तर दरमहा हप्ता दे, अशी मागणी केली. तरुणाला गजाने मारहाण केली. मारहाणीत तरुण जखमी झाला. मारहाण, तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीसन निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आलाटे तपास करत आहेत.