पुणे : गंभीर अपघात रोखणे, तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरात अवजड वाहनांना २४ तास बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. दहापेक्षा जास्त चाकी वाहने (मल्टी ॲक्सेल), कंटेनर, ट्रेलर, बल्कर अशा वाहनांचा यात समावेश आहे. सहा ते दहा चाकी वाहने व मालवाहू अवजड वाहनांना निश्चित केलेल्या मार्गांचा वापर मध्यरात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत करण्यास मुभा देण्यात आली आहे.

शहर परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेकडून प्रयत्न केले जात आहेत. वाहतूक शाखा, महापालिका आणि संबंधित विभागाकडून एकत्रित प्रयत्न करून निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता वाहतूक शाखेने शहरात येणाऱ्या जड वाहनांवर प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामधून मुंबई-बंगळूरू महामार्ग वगळण्यात आला आहे. तसेच, वाहतूक पोलिसांनी शहरात काही ‘रेड झोन’ तयार केले असून, या मार्गांवर वाहतूक शाखेच्या पूर्वपरवानगीनेच प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी संबंधितांना वाहतूक शाखेकडे अर्ज करावा लागणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहनांना रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे. अवजड वाहनांनी नगर रस्ता, खराडी बाह्यवळण मार्ग, शास्त्रीनगर चौक, येरवड्यातील गोल्फ क्लब चौक, आळंदी रस्ता, चंद्रमा चौक, होळकर पूल, खडकीमार्गे इच्छितस्थळी जावे. खराडी बाह्यवळण मार्ग, मुंढवा चौक, मगरपट्टा, भैरोबानाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौक, मार्केट यार्डमार्गे इच्छितस्थळी जावे. सोलापूर रस्त्याने येणाऱ्या अवजड वाहनांनी हडपसर, भैराेबानाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. हडपसरकडून मंतरवाडी, सासवड रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. असे आवाहन झेंडे यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मार्गांवर बंदी…

वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांसाठी बंदी घातलेले शहरातील प्रमुख मार्ग निश्चित केले आहेत. हे मार्ग पुढीलप्रमाणे : नगर रस्ता – विमाननगर चौक ते दत्त मंदिर चौक, शास्त्रीनगर चौकातून कल्याणीनगरकडे जाण्यास मनाई, येरवड्यातील पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे जाण्यास बंदी, वडगाव शेरीतून कल्याणीनगर भागातील बिशप शाळेकडे जाण्यास मनाई, पेट्रोल साठा चौकातून लोहगाव विमानतळ रस्त्याकडे जाण्यास बंदी, जुना मुंबई-पुणे रस्ता- पाटील इस्टेटकडून शिवाजीनगर अभियांत्रिकी चौकाकडे जाण्यास बंदी. गणेशखिंड रस्ता – ब्रेमेन चौकातून विद्यापीठाकडे जाण्यास बंदी, ब्रेमेन चौकातून औंध परिहार चौकाकडे जाण्यास बंदी, औंध-वाकड रस्त्यावरून महादजी शिंदे पुलावरून पुढे जाण्यास बंदी. बाणेर रस्ता- राधा चौकातून बाणेरकडे जाण्यास बंदी, पौड रस्ता- पौड रस्त्यावरून नळ स्टाॅपकडे जाण्यास बंदी, पौड रस्त्यावरून विधी महाविद्यालय रस्त्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी. कर्वे रस्ता -कर्वे पुतळा, कोथरूडकडून पौड फाटा चौकात जाण्यास बंदी. सिंहगड रस्ता – राजाराम पूलाकडून स्वारगेटकडे जाण्यास बंदी, राजाराम पूल चौकातून कर्वेनगर, डीपी रस्त्याकडे जाण्यास बंदी. सातारा रस्ता – मार्केट यार्ड चौकातून स्वारगेटकडे जाण्यास प्रवेश बंद, दांडेकर पूलाकडून शास्त्री रस्त्याकडे जाण्यास बंदी, मित्र मंडळ चौकातून सारसबागेकडे जाण्यास बंदी. सोलापूर रस्ता- सेव्हान लव्हज चौकातून टिंबर मार्केटकडे जाण्यास बंदी, स्वारगेटकडे जाण्यास बंदी, गोळीबार मैदान चौकातून लष्करकडे जाण्यास बंदी. भैरोबा नाला चौकातून एम्प्रेस गार्डनकडे जाण्यास बंदी, रेसकोर्सकडेव जाण्यास बंदी, रामटेकडी चौकातून बी. टी. कवडे रस्त्यावर जाण्यास बंदी, मगरपट्टा चौकातून मुंढव्याकडे जाण्यास मनाई.