पुणे : लॉटरी, बक्षीस लागल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या सायबर चोरांनी आता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा आधार घेऊन फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. पाणीपट्टी थकबाकी भरा, अन्यथा रात्री नळजोड तोडण्यात येईल, असे मेसेज आणि लिंक पाठवत नागरिकांना तातडीने थकबाकी भरण्यास सांगून फसवणूक केली जात आहे. अशा पद्धतीने फसवणूक झाल्याच्या काही तक्रारी महापालिकेकडे आल्यानंतर सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

‘नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून किंवा वीजबिल थकीत असल्याचे सांगून फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये आता महापालिकेची पाणीपट्टीच्या थकबाकीचे मेसेज पाठवून फसवणूक केली जात आहे. दरम्यान, अशा प्रकारचे कोणतेही मेसेज पालिकेकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनी असे मेसेज आल्यानंतर तातडीने पालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करावी,’ असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

महापालिकेचे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी फेब्रुवारी, मार्च महिन्यात महापालिकेकडून शहरातील पाणीपट्टी थकबाकीदारांना थकबाकी भरण्याचे मेसेज पाठविले जातात. ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरण्याचे आवाहन यामध्ये केले जाते. याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरांनी नागरिकांना नळजोड तोडण्याची भीती दाखवून, तातडीने बिल भरण्याचे खोटे मेसेज पाठविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात आले आहे.

येथे करा संपर्क

‘पाणीपट्टीची थकबाकी भरण्याबाबत नागरिकांना मेसेज आल्यानंतर नागरिकांनी संबंधित मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये. असे मेसेज आल्यानंतर नागरिकांनी पाणीपट्टी बिलावरील चॅटबॉट क्रमांक ८८८८२५१००१ वर संपर्क साधावा. किंवा महापालिकेच्या कॉल सेंटर क्रमांक १८००१०३२२२ वर संपर्क साधावा तसेच पालिकेच्या संबंधित विभागातील मीटर रिडरकडे याबाबत माहिती घ्यावी,’ असे आवाहन महापालिकेने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणीपट्टी थकबाकी असल्याचे मेसेज पाठवून फसणूक होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. महापालिका असे कोणतेही मेसेज पाठवित नाही. या फसवणुकीच्या मेसेजबाबत पोलिसांच्या सायबर सेल विभागाला पत्र दिले जाणार आहे. नागरिकांनी मेसेज आल्यानंतर फसवणूक टाळण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधावा.- नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे महापालिका