पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने खासगी टँकरचालकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरच्या दरात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे खासगी टँकरचालकांकडून पाण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना आणखी आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.
शहरातील ज्या भागामध्ये महापालिकेच्या वतीने कमी पाणीपुरवठा केला जातो, तेथील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतु:शृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी पाणीपुरवठा भरणा केंद्र आहेत.
खासगी टँकरचालकांनाही या ठिकाणांहून महापालिकेकडून पाण्याची व्यवस्था केली जाते. त्यासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. नागरिकांकडून टँकरच्या मागणीत वाढ होत असून, मे महिन्यात मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असताना महापालिकेने या दरात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या खासगी टँकरचालकांना ६६६ रुपयांना मिळणारा दहा हजार लिटरचा टँकर आता महापालिकेकडून ६९९ रुपयांना दिला जाणार आहे. वाढती महागाई आणि पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. महापालिकेने टँकरच्या दरात वाढ केल्याने टँकरचालकांंकडूनही दरांत वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.
टँकरचे दर
टँकरची क्षमता – सध्याचा दर – नवीन दर
१० हजार लिटर – ६६६ – ६९९
१० ते १५ हजार लिटर – १०४८ – ११०१
१५ हजार लिटरपेक्षा अधिक – १४७८ – १५५२