पुणे : ‘विनोबांनी सांगितलेला जय जगतचा विचार डॉ. विश्वनाथ कराड यांच्यासारख्या विश्व शांतीचे कार्य करणाऱ्या फार कमी माणसांकडे उरलेला दिसून येतो. सध्या भौतिकतावादाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले असून सगळ्या जगाचा ओढा केवळ भौतिक सुखांकडेच आहे, असे दिसते. अशा काळात लोकसेवेसाठी आपले जीवन समर्पित करायला हवे, कारण आजही देशातील ११ कोटी जनतेला वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाहीत,’ अशी खंत सर्च फौंडेशनचे संस्थापक-संचालक, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी मंगळवारी व्यक्त केली.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात अभय बंग यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी बंग बोलत होते. कार्यक्रमाला एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व आबुधाबी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. तईब कमली, संस्थेचे डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आदी उपस्थित होते.

या वेळी अहमदाबाद आयआयएमचे संचालक प्रा. भरत भास्कर यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’, एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’, प्रसिध्द चित्रपट निर्माते-दिग्दर्शक-लेखक विवेक अग्निहोत्री आणि प्रसिद्ध गायक-संगीतकार शेखर सेन यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आजचे युग भौतिकवादी जगाकडे पळत आहे. मात्र, इथे विज्ञान-अध्यात्म आणि विवेकानंद यांचा त्रिवेणी संगम झाला आहे. आज देण्यात आलेला हा पुरस्कार गडचिरोलीतील सर्व नागरिकांना समर्पित करतो,’ अशी कृतज्ञ भावना बंग यांनी या वेळी व्यक्त केली. डॉ. माशेलकर म्हणाले. ‘आजच्या काळात सर्वांनीच समाजकार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी तरूणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरावी. समाजात सकारात्मक बदल घडविण्यावर लक्ष केंद्रित करावे.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौतम बापट केले. डॉ. मंगेश कराड यांनी आभार मानले.