पुणे : एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी असलेल्या हर्षाली पोतदार यांची गुरुवारी उलटतपासणी घेण्यात आली. कोरेगाव भीमा येथील लढाई कोणत्याही विशिष्ट जाती, धर्माशी जोडता येणार नाही, या दाव्याला त्यांनी आयोगासमोर दुजोरा दिला नाही. पोतदार यांची साक्ष पुढील सुनावणीत कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून घेण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी घेण्यात येत आहे.

त्याकरिता विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी विविध जणांची साक्ष, उलटतपासणी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक पोतदार यांची उलटतपासणी गुरुवारी घेण्यात आली. ॲड. रोहन जमादार यांनी पोतदार यांची उलटतपासणी घेतली. ३१ डिसेंबर २०१७ रोजी भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानाच्या वतीने एल्गार परिषद शनिवारवाडा येथे आयोजित करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर आयोजक गटापैकी एक असलेल्या पोतदार यांची उलटतपासणी घेण्यात आली.

हेही वाचा : आंबेगाव येथे शरद पवार यांची सभा झाल्यास त्यांचं स्वागत करण्यास निश्चित जाणार : दिलीप वळसे पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कोरेगाव भीमा लढाईबाबत ब्रिटिश वर्तमानपत्रे आणि कागदपत्रे ॲड. जमादार यांनी सादर केली आणि ही लढाई कोणत्याही विशिष्ट जाती, धर्माशी जोडता येत नाही, असा दावा त्यांनी या वेळी केला. त्याला पोतदार यांनी दुजोरा दिला नाही. पोतदार यांनी आपल्या शपथपत्रात हिंदुत्ववादी संघटनांचे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर दंगलीचे आरोप यापूर्वीच केले आहेत. चौकशी आयोगाच्या वेळापत्रकानुसार शनिवारी (१६ सप्टेंबर) वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची उलटतपासणी घेण्यात येणार आहे.