पुणे : गेल्या महिन्यात शहरात सलग चार गोळीबाराच्या घटना घडलेल्या असतानाच शहराच्या मध्यभागात एकाने तरुणीवर गोळीबार केल्याची घटना घडली. प्रेयसीने संपर्क तोडल्याने एका तरुणाने तिच्या बहिणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गंज पेठेत घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. खडक पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी ऋषी बागुल आणि त्याचा साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका १८ वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास गंज पेठेत ही घटना घडली.

तक्रारदार तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेते. त्यांचा पत्रावळ्या आणि द्रोण तयार करण्याचा व्यवसाय आहे. तिची मोठी बहिण घटस्फोटित आहे. आरोपी ऋषी बागुलचे तिच्याशी प्रेमसंबंध आहेत. कुटुंबीयांना याबाबतची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. वाद झाल्यानंतर बहिणीने आरोपी ऋषीशी संपर्क तोडला. त्यामुळे तो तिच्यावर चिडला होता.

हेही वाचा…लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

ऋषी त्याच्या मित्रासोबत प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री दोनच्या सुमारास गंज पेठेत आला. त्याने घराचा दरवाजा जोरात वाजवून प्रेयसीला भेटायला बोलाविले. ती घरी नव्हती. तक्रारदार तरुणी आणि तिच्या मावस बहिणीने याबाबतची माहिती ऋषीला दिली. त्यानंतर त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा…अवकाळी पावसाचा पालेभाज्यांना फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदार तरुणीला बहिणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधायला लावला. तेव्हा तिने बिल न भरल्याने मोबाइलवरुन संपर्क साधता येणार नाही, असे ऋषीला सांगितले. तिने बहिणीला संदेश पाठविला. तेव्हा बहिणीने बोलण्यास नकार दिला. त्यानंतर ऋषी चिडला आणि त्याने तक्रारदार तरुणीवर पिस्तूल रोखले. तिच्या दिशेने पिस्तुलातून एक गोळी झाडली. तक्रारदार तरुणी अणि तिची मावस बहिण तेथून पळाल्या. गोळीबारानंतर ठिणगी उडाल्याने तरुणीच्या मावस बहिणीला किरकोळ दुखापत झाली. दोघी घरात गेल्याने बचावल्या. त्यांनी आतून कडी लावली. आरोपींनी घराबाहेर शिवीगाळ करून गोंधळ घातला. तरुणीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ऋषीला ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.