पुणे : सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून सोने-चांदीचे दागिने, मोटार असा ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरटे घरफोडी करण्यासाठी मोटारीतून फिरायचे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले होते.
गणेश अर्जुन पुरी (वय ३३, रा. मांजरी, मुळ. रा, ममदापुर, लातूर), रवीसिंग शामसिंग कल्याणी (वय २७, रा. रामटेकडी), निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी (वय ४४, रा. अंबरनाथ, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी हे १४ जून रोजी कुटुंबीयासोबत तुळजापूर- अक्कलकोट येथे दर्शनासाठी गेले होते. चोरट्यांनी बंद सदनिकेची पाहणी केली. कुलूप तोडून दागिने आणि रोकड लांबविली होती. याप्रकरणाचा हडपसर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. पसार झालेले चोरटे मोटारीतून पसार झाले होते. पोलिसांनी ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तांत्रिक तपासात आरोपी मुळशी तालु्क्यातील लवळे परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पुरीला लवळे परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत साथीदारांची नावे निष्पन्न झाले. त्यानंतर कल्याणी आणि दुधाणी यांना ताब्यात घेण्यात आले.
चोरटे सराइत आहेत. त्यांच्याकडून ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी, संदीप राठोड, नीलेश किरवे, बापू लोणकर, अजित मदने, अभिजीत राऊत यांनी ही कामगिरी केली.