पुणे : राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना, अनेक धरणांनी तळ गाठला असताना पुण्यातील पेशवेकालीन कात्रज तलावानेही तळ गाठला आहे. महापालिकेकडून जुलैमध्ये तलावातील गाठ काढून तलावाची साठवण क्षमता वाढवण्यात आली. मात्र, एप्रिलमध्येच तलावातील पाणी आटल्याचे दिसून येत आहे. सध्या हा तलाव राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचा भाग आहे. या तलावामुळे या परिसरातील जैवविविधता टिकून राहिली आहे. २०१९ मध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसावेळी कात्रज तलाव पूर्ण भरून वाहिल्याने पाणी आंबील ओढ्यात येऊन पर्वती, सहकारनगरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ आणि जलपर्णी निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेच्या सांडपाणी आणि मलनिस्सारण विभागाने जुलै २०२३ मध्ये कात्रज तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. त्या अंतर्गत दहा हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. तलावातील गाळ काढल्याने तलावाची साठवणूक क्षमता एक कोटी लीटरने वाढल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. मात्र यंदा एप्रिलमध्येच तलावाने तळ गाठल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र अंनिसने निवडणुकीतील उमेदवारांवर कारवाईची मागणी का केली ?

कात्रज तलावातील पाणी कमी होण्यासंदर्भात पर्यावरण अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, की पर्जन्यमान लक्षात घेऊन २०१९ पासून कात्रजचा तलाव कमी भरला जातो. यंदा पाऊस कमी पडल्यामुळे कात्रज तलाव पूर्ण भरला नव्हता. त्यामुळे पाण्याचे प्रमाण आधीच कमी होते. त्याशिवाय तलावात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यामुळे त्या पाण्याचे प्रमाण कमी झाले. तलावात जलपर्णी वाढल्यामुळे, बाष्पीभवन जास्त झाल्यासही पाणी कमी होऊ शकते. तसेच महापालिकेने गाळ काढण्यासाठी तलावातील पाणी कमी केलेले असू शकते. दरम्यान, गाळ काढण्याच्या कामासाठी तलावातील पाण्याची पातळी कमी करण्यात आली होती, अशी माहिती महापालिकेच्या सांडपाणी आणि मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक संतोष तांदळे यांनी दिली.

हेही वाचा : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण

गळतीचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक

कात्रज तलावात गळती आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागेल, याकडे डॉ. गबाले यांनी लक्ष वेधले.

कात्रज तलावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

सुमारे ४२ एकरात असलेल्या कात्रज तलावाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी माहिती दिली. नानासाहेब पेशवे यांनी १७४५ ते १७५५ या काळात कात्रजचा तलाव बांधला. या तलावातील पाण्याचा पुरवठा शनिवारवाडा आणि जुन्या पुण्यातील काही भागात भुयारी मार्गाने केला जायचा. या भुयारी मार्गादरम्यान काळा हौद, बाहुलीचा हौद, बदामी हौद, सदाशिव पेठ हौद येथे पाणी काढले जायचे. १९९० पर्यंत तलावातील पाण्याचा पुरवठा शहराला केला जायचा, असे त्यांनी सांगितले.