पुणे : डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात एका महिलेच्या पिशवीतून दहा लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शिवणे भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मुंबईतील ताडदेव भागात राहायला आहे. बहिणीच्या मुलीच्या डोहाळजेवण कार्यक्रमानिमित्त त्या आल्या होत्या. त्यांची बहीण शिवणे भागातील आर्यक रेसिडन्सी या सोसायटीत राहायला आहे. डोहाळजेवणाचा कार्यक्रम एका हाॅलमध्ये गेल्या महिन्यात २० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. तेथील कार्यक्रम आटाेपल्यानंतर त्या शिवणे भागात राहणाऱ्या बहिणीच्या घरी आल्या. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला.
तक्रारदार महिला मुंबईला गेल्या. त्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे तपास करत आहेत.
खासगी कंपनीतून साडेतीन लाखांचे साहित्य चोरणारा अटकेत
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा भागात असलेल्या एका खासगी कंपनीतून चोरट्यांनी तीन लाख ३४ हजार रुपयांचे यंत्र, तसेच साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी एकाला अटक केली.
याप्रकरणी संजय शंकर जमादार (रा. सिंहगड रस्ता) याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादारला ताब्यात घेतले आहे. याबाबत मुकेशकुमार ददानीराम मिश्रा (रा. नांदेड फाटा) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा यांची नांदेड फाटा परिसरात खासगी कंपनी आहे. आरोपी जमादार आणि सााथीदारांनी कंपनीतील पत्रा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी ब्लोअर यंत्र, ड्रिल, ग्राइंडर यंत्र, तसेच अन्य साहित्य चोरून नेले. मिश्रा यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून जमादारला ताब्यात घेतले. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करून तरुणाला बेदम मारहाण
पोलिसांचा खबरी असल्याच्या आरोप करून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना लोणी काळभोरमधील म्हातोबाची आळंदी परिसरात घडली. टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
याप्रकरणी करण शंकर गावडे (वय १९), आदित्य संतोष इंगोले (वय २४) यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राेहित सुभाष जावळकर (वय ३२, रा. सीतादेवीनगर, म्हातोबाची आळंदी, लोणी काळभोर) याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळकर घराजवळ थांबला होता. त्या वेळी आरोपी गावडे, इंगोले आणि त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार तेथे आले. ‘तू पोलिसांचा खबरी आहे’ असा आरोप करून आरोपी गावडे, इंगाेले आणि साथीदारांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जावळकर याच्या घराच्या परिसरातील गाड्यांची तोडफोड करून दहशत माजविली.
या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. पोलिसांनी आरोपी इंगोलेला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.