पुणे : मेट्रोच्या चार मुख्य स्थानकांवरून ‘शेअर’ रिक्षा सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय महामेट्रोबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठीचे सर्वेक्षण पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

‘वेकअप पुणेकर’ या चळवळीच्या वाहतूक या विषयासंदर्भातील परिषदेत काही दिवसांपूर्वी मेट्रो स्थानकाबाहेर शेअर रिक्षा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, ‘वेकअप पुणेकर’ अभियानाचे संयोजक मोहन जोशी आणि रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या पुढाकाराने महामेट्रो आणि रिक्षा पंचायत यांची एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला असून महामेट्रोकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा…पुणे : स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत ३०० कोटींचे प्रस्ताव मंजूर; दिवसभर महापालिकेत ठेकेदार, माजी लोकप्रतिनिधींचा राबता

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि जनसंपर्क विभागाचे हेमंत सोनावणे, तसेच मेट्रो मार्गावरील पौड रस्ता, शिवाजीनगर, राजा बहादूर मोतीलाल मिल (बंडगार्डन) रस्ता परिसरातील रिक्षा पंचायतीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईमध्ये लोकल ट्रेन स्थानकाबाहेर शेअर रिक्षांची रांग दिसते. तशी रांग मेट्रो स्टेशन बाहेर दिसत नाही. शेअर रिक्षा वापरासाठी पुणेकरांची मानसिकता तयार करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. रिक्षांची रांग ज्या मेट्रो स्थानकाबाहेर लागू शकेल, अशा मार्गांचा आढावा घेणे, तिथे जागेची उपलब्धता करून देणे आणि प्रायोगिक तत्त्वावर शेअर रिक्षा सुरू करणे, असे निर्णय बैठकीत झाले.

हेही वाचा…पुण्यात काँग्रेसकडून ओबीसी उमेदवार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या टप्प्यात दोन ते चार मेट्रो स्थानकांबाहेर शेअर रिक्षा सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर प्रतिसादानुसार या सेवेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबतचे सर्वेक्षण पुढील आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती मोहन जोशी आणि नितीन पवार यांनी दिली.दरम्यान, महामेट्रोच्या मुख्य कार्यालयाशेजारील कामगार पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची तयारी मेट्रो प्रशासनाने दर्शविली आहे.