पुणे : सिंहगड रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी राजकीय पक्षातील नेत्यांना वेळ मिळत नसल्याने विलंब होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करत सोमवारी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असताना पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली, तरी सोबत आणलेल्या क्रेनवर चढून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उड्डाणपुलाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन केले.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन्ही बाजुंनी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. त्यातील धायरीकडे जाणाऱ्या बाजुचा पूल खुला झाला असून धायरीकडून राजाराम पुलाकडे येणारी बाजू अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. जनसामांन्यांच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसेने आक्रमक भूमिका घेत सोमवारी आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी मंत्र्यांसाठी प्रशासन उड्डाणपूल सुरू करण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. वाहतूक कोंडीद्वारे जनतेला वेठीस धरून प्रशासनाला नक्की काय साध्य करायचे आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांशी काही देणे घेणे आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला.

यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविण्याचा लोखंडी अडथळे (बॅरिकेट्स) लावण्यात आले होते. मात्र, आक्रमक कार्यकर्त्यांनी सरकार, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बॅरिकेट हटवून उड्डाणपूलाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. मात्र, मनसेकडून आणलेल्या क्रेनवर चढून प्रशासनाच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून पुन्हा वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी नोकरी, व्यवसाय, कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे पहावयास मिळाले.

महानगरपालिकेकडून या पुलावरील किरकोळ कामे अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी काँग्रेस, शिवसेना ( ठाकरे) आणि मनसे पक्षांकडून राजकीय नेत्यांना श्रेय घेण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला जात नसल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना ( ठाकरे) पक्षाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी होमहवन आणि पूजा घालून आंदोलन करण्यात आले असताना सोमवारी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी आक्रमक भूमिका घेतली.

सिंहगड रस्त्यावरून शहाच्या दिशेने येणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी, जनसामांन्य नागरिकांना दैनंदिन वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असून याच जनसामांन्यांच्या खिशातील पैशाने हा उड्डाणपूल बांधला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र, त्यांना जनतेच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही. राज्यातील नेते, मंत्री आणि प्रशासनाकडून हेतुपूरस्सर जनतेला वेठीस धरले जात आहे. जोपर्यंत हा उड्डाणपूल सुरू केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार. – साईनाथ बाबर, शहरप्रमुख, मनसे.