पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर मागील सात महिन्यांच्या कालावधीत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. त्याच दरम्यान अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेल्यानंतर, उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पद देखील मिळाले. त्यानंतर अजित पवार यांनी कर्जत जामखेड येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना जवळपास २०० कोटींहून अधिकचा निधी दिला होता. त्यामुळे अजित पवार हे रोहित पवार यांची या माध्यमांतून राजकीय कोंडी करित असल्याचे चित्र दिसून आले आहे. या सर्व घडामोडींदरम्यान रोहित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदार संघात दौर्‍यांचे प्रमाण वाढवले आहे. आज देखील रोहित पवार यांनी हडपसर मधील काही लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.

हेही वाचा : पिंपरी चिंचवडमध्ये पाणीटंचाई : ‘हे’ आहे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, तुम्ही हडपसर विधानसभा निवडणुक येत्या काळात लढविणार का ? त्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, हडपसर भागात कर्जत जामखेड मतदार संघातील नागरिक मोठ्या प्रमाणावर राहण्यास आहेत. मी येथील नागरिकांना नेहमीच भेटत असतो. मध्यंतरी युवा संघर्ष यात्रेदरम्यान अनेक कार्यक्रम या भागात झाले. पण मला युवा संघर्ष यात्रेमुळे येता आले नाही. त्यामुळे आज अनेक लोकांच्या गाठीभेटी घेत आहे. माझे मतदार मला परवानगी देणार नाही आणि मी तसा विचार देखील करणार नाही. मला ज्या लोकांनी लढायला शिकवले, मी त्या लोकांना सोडून जाणार नाही. मला ज्या कोणी नेत्यांनी आव्हान दिले आहे. मी त्याला घाबरणार नाही. माझा नेत्यांपेक्षा लोकांवर अधिक विश्वास आहे. त्यामुळे विरोधी नेत्यांनी (अजित पवार) कितीही ताकद लावली तरी लोक माझे आहेत आणि मी त्यांचा आहे. त्यामुळे लोकांवर विश्वास असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राम शिंदे यांना रोहित पवार यांनी टोला लगावला.