पुणे : जल, जंगल आणि जमीन या क्षेत्राकडे सध्या लक्ष देण्याची गरज आहे. यातून देशातील बहुतांश समस्या दूर होतील. त्यामुळे भारतीय जैन संघटनेने यात काम करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. देशात समस्या आली त्यावेळी जैन समाजाने ती समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला, अशा शब्दांत त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या कार्याचा गौरव केला.

भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सकल जैन समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा, उद्योजक प्रकाश धारिवाल, गणपत चौधरी, विठ्ठल मणियार, जितोचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, राजेंद्र लुंकड, वालचंद संचेती, राजेश मेहता, वल्लभ भन्साळी, डॉ चैनराज जैन, कोमल जैन, सरला मुथा या वेळी उपस्थित होत्या.

हेही वाचा : रेल्वेचा गर्दी टाळण्यासाठी पुण्यासह मुंबई अन् इतर ठिकाणी मोठा निर्णय

शैक्षणिक आणि सामाजिक कामात मागील ४० वर्षांपासून शांतिलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे मोठे काम केले आहे, असे सांगून पवार म्हणाले, ‘समाजाची सेवा करण्यासाठी जैन समाज कायम प्रयत्नशील आहे. लातूर भूकंपाच्या वेळी समस्या सोडवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा शांतिलाल मुथा यांनी मोठे काम केले. अनाथ मुलांना पुण्यात आणून त्यांना आसरा दिला. त्यानंतर गुजरातमध्ये झालेल्या भूकंपादरम्यान देखील संघटनेने मोठे काम केले. त्यामध्ये पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, अन्न, औषधी यासह विविध समस्या सोडविल्या.’

देशाच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत जैन समाजाचे मोठे योगदान आहे. समाज एकविचाराने राहिला. सर्वांनी एकत्रित सातत्याने काम केले तर फार मोठे काम होते. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जैन समाज आहे. भविष्यात प्रत्येक चांगल्या कामात आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही मोहोळ यांनी दिली. करोना काळात पुणेकरांच्या सेवेसाठी जैन संघटनेचे काम मोठे केले, असा गौरवही त्यांनी या वेळी केला.

हेही वाचा : पिंपरी : आचारसंहिता संपताच पीएमआरडीए ॲक्शन मोडवर; अनधिकृत बांधकाम धारकांवर थेट..

मुथा म्हणाले, ‘संकटाच्या काळात जैन समाज सगळ्यात पुढे उभा असतो. गुजरातमध्ये झालेल्या भूकंपादरम्यान संघटनेने ३६८ शाळा उभारल्या. संघटना सध्या देशातील दहा जिल्ह्यांत पाण्याच्या समस्येवर काम करीत आहे. पुढील काळात शंभर जिल्ह्यांमध्ये हे काम वाढविले जाईल.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी अजून तरुणच

‘शरद पवार हे ८४ वर्षांचे असून अजून तितक्याच जोशाने काम करतात’, असे सूत्रसंचालकाने सांगितले. त्यावर ‘कोणी सांगितले मी ८४चा आहे?’ असा प्रतिप्रश्न करत मी अजून तरुणच आहे असे पवार यांनी सूचित केले. त्यांच्या या वक्तव्याला सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.