पुणे : दिवाळी म्हटले, की नवीन कपडे, फटाके आणि खाऊ असे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते. सर्वसामान्य घरातील मुलांना त्यांचे आई-वडील बाजारात नेऊन ही खरेदी करून देतात. पण साडेतीन महिन्यांपूर्वी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये ज्यांचे पालक, घरदार नष्ट झाले, अशा इरशाळवाडीतील अनाथ मुला-मुलींनी शुक्रवारी तुळशीबागेत दिवाळी खरेदीचा आनंद लुटला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत मनमुराद खरेदी करत त्यांनी दिवाळी साजरी केली.

राष्ट्रप्रथम ट्रस्ट, वंदे मातरम् संघटना, दशरथ भानगिरे ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्ट, तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून आणि जय गणेश व्यासपीठातर्फे दरडग्रस्त इरशाळवाडीतील मुला-मुलींसाठी ‘पुण्याची दिवाळी सहल आणि आनंद मेळा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी ४५ मुला-मुलींना बिस्किटे, सुका मेवा, वेफर्स, चाॅकलेट देण्यात आले. या मुलांनी गणेशोत्सव कार्यकर्त्यांसमवेत आईस्क्रीमचा स्वाद घेण्याचा आनंद लुटला. शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, वैभव वाघ, अश्विनी शिंदे, विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : VIDEO: शिवकालीन दिवाळीचे संदर्भ आणि पेशवेकालीन फटाक्यांची वैशिष्ट्यपूर्ण नावं! गोष्ट पुण्याची-१३६

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इरशाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी तत्काळ उपयोजना अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. अशा परिस्थितीतही त्यातील मुला-मुली पुन्हा शाळेत जायला लागले आहेत. त्यांनी शिकून मोठे व्हावे आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करावे यासाठी आवश्यक ती मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि मंडळाने प्रेमाने या सर्व मुलांचे आदरातिथ्य केले आहे. दिवाळीनिमित्त खरेदीचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. असेच आपण सर्व या मुलांच्या घरातील सदस्य असल्याप्रमाणे कायम त्यांच्यासोबत राहूयात.’