पुणे : पंढरपूर येथे जाण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (२० जून) पुणे शहरात मुक्कामी येणार आहे. यानिमित्त आवश्यक ती तयारी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या पातळ्यांवर अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी बैठका घेण्याचे सत्र सुरू केल्याने महापालिकेतील कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र दिसत आहे. अधिकारी जागेवर नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

दर वर्षी पालखी सोहळा पुणे मुक्कामी असताना आवश्यक ते नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासन, तसेच पोलीस विभाग यांच्यामध्ये बैठका होतात. मात्र, यंदा वारीच्या बैठकांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये अपवादात्मक एखादा दिवस वगळला, तर दररोज वारीच्या नियोजनाच्या बैठका घेण्यात येत असल्याने महापालिका अधिकारीही हैराण आहेत.

वारीच्या नियोजनासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी दहा दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी त्याचा आढावादेखील महापालिका प्रशासनाकडून घेतला जात आहे.

चार दिवसांपूर्वी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यामध्ये महापालिकेतील विविध विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत वारकऱ्यांना महापालिकेने पुरेशी शौचालये, पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याचे, रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश देण्यात आले.

या बैठकीनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी विश्रांतवाडी येथे जाऊन पालखी मार्गाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही वारीच्या नियोजनासाठी बैठकांचे आयोजन केल्याने राजशिष्टाचार म्हणून महापालिका अधिकाऱ्यांना त्या बैठकांत उपस्थित राहून वारीसाठी केलेल्या नियोजनाची माहिती द्यावी लागली.

भाजपच्या शहरातील नेत्यांसह पालखी मार्ग कसबा विधानसभा मतदारसंघातून जात असल्याने आमदार हेमंत रासने यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेत आवश्यक त्या सूचना केल्या. गेल्या काही दिवसांपासून शहरातील नेते वेगवेगळ्या वेळेत वारीची बैठक घेत असल्याने महापालिका अधिकारी त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, पालखी दोन दिवसांत शहरात येत असल्याने बुधवारी पोलीस आणि महापालिका अधिकारी यांचीही एक बैठक महापालिकेत झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ही बैठक घेतली. अडीच ते तीन तास बैठक सुरू होती. त्यामुळे अनेक विभागप्रमुख त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले.

दोन्ही पालख्या शुक्रवारी पुण्यात दाखल होत आहेत. यामध्ये काही अडचणी आल्यास महापालिका, पोलिसांचे नियोजन काय असेल, यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. महापालिकेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महापालिका