पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर टीका करणारे लेखक प्रा. नामदेव जाधव यांना काळे फासल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवनासमोर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याबाबत जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पुण्यात रोहित शर्मा, विराट कोहलीच्या पोस्टरला मनसैनिकांकडून दुग्धाभिषेक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाधव यांचे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालयामध्ये शनिवारी दुपारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मात्र, सुरक्षिततेच्या कारणावरून पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी जाधव सायंकाळी सहाच्या सुमारास नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आले. तेथे ते पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तेथे आले. कार्यकर्त्यांनी जाधव यांना धक्काबुक्की करून काळे फासले. या घटनेनंतर तेथे गोंधळ उडाला. त्या वेळी तेथे असलेल्या पोलिसांनी सुरक्षा कवच करून जाधव यांना मोटारीमध्ये बसवले. तेथून जाधव विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले. जाधव यांनी फिर्याद नोंदवली. जाधव यांच्या बरोबर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून गणवेशावर शाई फेकण्यात आली.