पुणे : पोलिसांकडून शहरातील पब, मद्यालय चालकांविरुद्ध (रेस्टॉरंट आणि बार) कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मध्यरात्री दीडपर्यंत पब आणि मद्यालय सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब आणि मद्यालयांविरुद्ध कारवाई करावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.
शहरातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी रात्री दहानंतर हाॅटेल बंद करण्याच्या सूचना देत आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे ग्राहक आणि हाॅटेलचालक धास्तावले आहेत. पोलिसांनी कारवाई सौम्य करावी. हाॅटेल रात्री दीडपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. कारवाईमुळे हाॅटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. पोलिसांनी कारवाईबाबत विचार करावा, अशी मागणी पब, मद्यालय चालकांच्या संघटनेने बुधवारी केली.
हेही वाचा – आरटीई शुल्क प्रतिपूर्तीचा दर शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित
हेही वाचा – महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास महागात पडणार
हाॅटेलचालकांची बाजू ऐकल्यानंतर पोलीस अधिकारी आाणि कर्मचाऱ्यांनी रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेलमध्ये प्रवेश करू नये, असे आदेश अमितेश कुमार यांनी दिले. रात्री दीडनंतर हाॅटेल सुरू राहिल्यास व्यवस्थापकाला समज देऊन कारवाई करण्यात येणार आहे. हाॅटेलमधील ग्राहकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार नाही. दीड वाजल्यानंतर अर्धा तास हाॅटेलमधील स्वयंपाकघराची साफसफाई करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. हाॅटेलमधील ध्वनिवर्धक रात्री दहावाजेपर्यंत सुरू ठेवावेत. पोलिसांनी दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.