पुणे : सध्याचे राज्यकर्ते आमच्याबरोबर औरंगजेबापेक्षा वाईट वागतात, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे मंगळवारी केली. प्रशांत कोरटकरला पकडण्यासाठी एक महिना का लागला, अशी विचारणाही शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी यांनी मंगळवारी साखर आयुक्तालयात साखर आयुक्त सिद्दराम सलीमथ यांची भेट घेतली. ऊस उत्पादकांना उसाची रास्त आणि किफायतशीर रक्कम (एफआरपी) एकरकमी द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतरही कारखान्यांनी रक्कम थकविली आहे. त्यामुळे या रकमेवर शेतकऱ्यांना व्याज देणे बंधनकारक करावे, या मागणीसाठी ही भेट त्यांनी घेतली. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पृथ्वीराज जाचक आणि ॲड. योगेश पांडे यावेळी उपस्थित होते.

राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी कोरटकर, राहुल सोलापूरकर अशा माणसांचे मुद्दे पुढे केले जात आहेत. शेतकऱ्यांची तब्बल सात हजार कोटींची एफआरपी कारखान्यांनी थकविली आहे. त्यावर कोणी बोलू नये, यासाठी संवेदनशील विषयांवर बोलण्यासाठी प्यादी पुढे केली जात आहेत, अशी टीका शेट्टी यांनी केली.

ते म्हणाले की, प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, या चिल्लर माणसाला पकडण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी का लागला. याचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी द्यावे.’

‘सर्वसामान्यांचे प्रश्न मागे पडले आहेत आणि महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी संवेदनशील विषयांवर जाणीवपूर्वक विधाने करण्यासाठी माणसांची पेरणी केली जात आहेत. संवेदनशील विषय पुढे करून लोकांना भडकाविण्याचे काम करून अपयश सरकार लपवत आहे, असेही शेट्टी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एफआरपी एकरकमी द्यावी, असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. मात्र, राज्य शासनाने दोन टप्प्यात एफआरपी द्यावी, असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बेकायदा आहे. कारखाने रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत. एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.