पुणे : गेल्या दोन दिवसापासून शहर आणि परिसरात पडत असलेल्या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. या नद्या दुथड्या भरून वाहत असून खडकवासला तसेच पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मावळ येथील पवना धरणातून पाणी सोडले जात असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुणे शहराचे प्रवेशद्वाराजवळील आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडणाऱ्या बोपोडी येथील हॅरीस पुलाखालील रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता हा रस्ता बंद करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी ही माहिती दिली.

पुणे महापालिकेच्या औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत हा भाग येतो. पिंपरी चिंचवड शहराकडून पुणे महापालिकेच्या हद्दीत प्रवेश करून हॅरीस ब्रिजवरून बोपोडी, औंध तसेच पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी वाहनचालक या रस्त्याचा उपयोग करतात. दरवर्षी पावसाळ्यामध्ये नदीला पूर आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून हा रस्ता बंद केला जातो. यंदा जून महिन्यात पहिल्यांदाच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

गुरुवारी सकाळपासून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साठले होते. त्यामधून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. सतत पडत असलेला पाऊस आणि रस्त्यावर साठलेले पाणी यामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर झालेल्या या वाहतूक कोंडीचा फटका कामाला येताना आणि कामावरून घरी जाताना नागरिकांना बसला. गुरुवारी रात्री मध्यरात्री पर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खडकवासला धरणातून नऊ हजार क्युसेक पाणी

खडकवासला धरणातून गुरुवारी दुपारी १ वाजता सुमारे २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर त्यामध्ये वाढ करत चार हजार क्युसेक तर रात्री उशिरा नऊ हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत होते. त्यामुळे मुठा नदीच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अनावश्यक प्रवास आणि नदीकाठी फिरणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, कृपया कोणीही नदीपात्रात उतरू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात जनावरे अथवा तत्सम साहित्य असल्यास ते तातडीने काढून घ्यावे. पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागांतील नागरिकांना योग्य सूचना देण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.