पुणे : ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून चोरट्यांनी ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना हडपसर भागातील मांजरी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ६५ वर्षीय नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक मांजरीतील तुकाराम तुपे नगर भागात राहायला आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास ते घरात होते. त्या वेळी घरात कोणी नव्हते. घराचा दरवाजा उघडाच होता. अचानक एक चोरटा घरात शिरला आणि त्याने त्यांच्या गुडघ्यावर कठीण वस्तूने प्रहार केला. चोराने हल्ला केल्याने ते घाबरले. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांच्या गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला.
ज्येष्ठ नागरिकाने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावत आले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. घरात एकटे असलेल्या ज्येष्ठाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून लुटण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात घबराट उडाली. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.
खराडीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
पादचारी महिलेच्या गळ्यातील पावणेतीन लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना खराडी भागात घडली. याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५६ वर्षीय महिला चंदननगर भागात राहायला आहेत. त्या शनिवारी रात्री जेवण करून रात्री सव्वादहाच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या. खराडी रस्त्यावरील साईकृष्णा हाॅटेलसमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी खराडी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले तपास करत आहेत.
विमाननगर भागात महिलेचे दागिने हिसकावले
रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना विमाननगर भागात घडली. याबाबत एका ५२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला विमाननगर भागात राहायला आहेत. त्या रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास लुंकड क्लासिक सोसायटीसमोर रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन लाख ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत.