पुणे : अहिल्यानगर येथे खोटे शासन निर्णय तयार करून कोट्यवधी रुपयांची लूट, मुंबईत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून उपाहारगृह चालकाला मारहाण आणि पुणे शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी यासारख्या गंभीर घटनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने स्वारगेट पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल करण्यात आला.
या तक्रारीसंदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांची भेट घेऊन विविध प्रकरणांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे, सचिन दोडके, काका चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
अहिल्यानगर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाखाली बनावट शासन निर्णय तयार करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे गुन्हेगार मोकाट आहेत. सामान्य जनतेच्या कररुपी पैशांची लूट थांबवण्यासाठी आणि दोषींना शासन देण्यासाठी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मुंबईत एका उपाहारगृह चालकाला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. कायद्याचा अपमान करत लोकप्रतिनिधींनी असे वर्तन करणे हा राज्यघटनेच्या मूलभूत मूल्यांवर आघात आहे, असे मत व्यक्त करून या आमदारावर तत्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
कोयता गँगचा उद्रेक, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक, घरफोड्या अशा घटनांमुळे पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहराला गुन्हेगारीचे माहेरघर बनवण्याचे काम सध्या सुरू असून त्याविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका या तक्रार अर्जामध्ये मांडण्यात आली आहे.