पुणे : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील घाट परिसराला पावसाने झोडपले आहे. विशेषतः ताम्हिणी येथे अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार बुधवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत ताम्हिणी येथे तब्बल ५७५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
पावसासाठी अनुकुल स्थिती निर्माण झाल्याने राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने १८ ते २० ऑगस्ट या तीन दिवसांसाठी पुण्याच्या घाट परिसरासह काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे. त्यानुसार घाट परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत ताम्हिणी येथे ३२० मिलिमीटर, लोणावळा येथे १८९, तर मुळशी येथे ८० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता, तर आज सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत एकट्या ताम्हिणी येथे ५७५, लोणावळा येथे ४१८, मुळशी येथे १६२ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. यंदाच्या मोसमातील ताम्हिणी येथील पाऊस आता ७ हजार ४२८ मिलिमीटरवर गेला आहे. गेल्या वर्षी ताम्हिणी येथे सुमारे ९५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत गिरीवन येथे १६८.५, तळेगाव येथे ९५, चिंचवड येथे ८८, लवळे येथे ८१, शिवाजीनगर येथे ६०.८, राजगुरूनगर येथे ५९.५, डुडुळगाव येथे ५२, निमगिरी येथे ५०, हडपसर येथे ४९.५, पाषाण येथे ४१.३, ढमढेरे येथे ३०.५, माळीण येथे १६.५, दौंड येथे ७.५, दापोडी येथे ७.५, बारामती येथे ६.४, तर मगरपट्टा येथे ६ मिलिमीटर पाऊस पडला.