पुणे : प्रोस्टेट ग्रंथीच्या पारंपरिक शस्त्रक्रियेला फाटा देत विनाशस्त्रक्रिया प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. अवघ्या १० मिनिटांत कोणत्याही त्रासाशिवाय प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करणारे ‘रिझूम थेरपी’ तंत्रज्ञान पुण्यातील बाणेरस्थित युरोकुल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे. ‘युरोकुल’चे संस्थापक व युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला.

‘रिझूम थेरपी’ यंत्राद्वारे पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार केल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी रुग्णांसह पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, प्रोस्टेट ग्रंथींवरील पारंपरिक शस्त्रक्रियेला ‘ट्रांसयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ द प्रोस्ट्रेट’ (टीयूआरपी) म्हणून ओळखले जाते. यामध्ये रुग्णाला साधारण दोन ते तीन दिवस रुग्णालयात राहावे लागते. ही शस्त्रक्रिया तब्बल तासभर चालते. रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. शिवाय, लैंगिक संबंधांनंतर रुग्णांची वीर्यस्खलन करण्याची क्षमता नष्ट होते. यावर उपाय म्हणून युरोकुलने हे नवीन तंत्रज्ञान भारतात आणले आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडकरांची कचरा सेवा शुल्कातून सुटका; प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी आहे रिझूम थेरपी…

रिझूम थेरपी तंत्रज्ञानाद्वारे विनाशस्त्रक्रिया प्रोस्टेट ग्रंथींचा वाढलेला भाग पाण्याच्या वाफेच्या सहाय्याने विरघळून टाकता येतो. ही थेरपी सामान्यत: बाह्यरुग्ण प्रक्रिया म्हणून केली जाते. या यंत्रामुळे प्रोस्टेट ग्रंथीवरील उपचार अवघ्या १० मिनिटांत होत असून, रुग्ण त्याच दिवशी दोन ते तीन तासांत घरी जाऊ शकतो. रुग्णाच्या शरीरात एक लहान कॅथेटर ५-७ दिवस ठेवला जातो. या प्रक्रियेनंतर रुग्णांना होणाऱ्या त्रासापासून त्वरित आराम मिळू लागतो आणि जास्तीत जास्त फायदा तीन महिन्यांत दिसू लागतो.