पुणे : बँकेच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने बँकेचे अॅप अद्ययावत करून देतो अशी बतावणी करून एकाला दोन लाख रुपयांना गंडा घातला आहे. १४ ते १५ सप्टेंबर कालावधीत सोमवार पेठेत ही घटना घडली असून याप्रकरणी ५४ वर्षीय नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोमवार पेठेत राहायला असून, १४ सप्टेंबरला सायबर चोरट्याने त्यांच्याशी संपर्क साधला. बँकेच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी केली. बँकेचे अॅप अद्ययावत करून देतो असे सांगून त्याने तक्रारदाराला एक फाईल पाठविली. त्यानंतर ती फाईल उघण्यास सांगून ऑनलाईन पद्धतीने १ लाख ९० हजार रूपये वर्ग करून घेत तक्रारदाराची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मंगेश हांडे तपास करीत आहेत.
पीएमपी प्रवासात ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरीला
पुणे शहरातील विविध भागातून पीएमपी प्रवास करणाऱ्या महिलांना चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले असून ज्येष्ठ महिलांसह गावाहून आलेल्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडील ऐवज लुटीचे प्रमाण वाढले आहे. पीएमपी बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. आळंदी देवाची ते कुमार पॅसिफिक मॉल दरम्यान १७ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मुळशी तालुक्यातील भादसमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला मुळशी तालुक्यातील भादस गावातील रहिवासी आहेत. १७ सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास ही महिला आळंदी देवाची ते कुमार पॅसिफिक मॉल असा पीएमपी बस प्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी पोलीस अमलदार दुडम तपास करीत आहेत.