पुणे : गुंड शरद मोहोळ याच्यावर काल दुपारच्या सुमारास साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने गोळीबार केला होता. या हल्ल्यात शरद मोहोळ याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर, काही तासांतच मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह आठ जणांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. तर शरद मोहोळवर गोळीबाराचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोथरूड येथील सुतारदारा येथे गुंड शरद मोहोळवर काल दुपारच्या सुमारास साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने गोळीबार केला. त्यानंतर मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा साथीदारासह घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर पोलिसांकडून आरोपीच्या शोधासाठी पुणे शहर गुन्हे शाखेची ९ तपास पथके पुणे शहर परिसर आणि पुणे ग्रामीण, सातारा, कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती.
हेही वाचा : मोठी बातमी : शरद मोहोळ खून प्रकरणात दोन वकील सामील, आरोपींसह वकील अटकेत
त्याच दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ दरम्यान संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून ८ आरोपी, ३ पिस्तूल, ३ मॅगझीन, ५ राउंड आणि २ चार चाकी गाड्यांसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर शरद मोहोळ बरोबर जमिनीच्या पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी शरद मोहोळची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेला काही तास होत नाही, तोवर शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आलेला सीसीटीव्ही समोर आला आहे.