पुणे : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील सायबेज सॉफ्टवेअर कंपनी जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला नोटीस बजावली आहे. कंपनीकडून इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्यातून हे प्रदूषण होत असल्याने स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती. दरम्यान, या प्रकरणी कंपनीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

वडगाव शेरीतील कुमार कृती सोसायटीत सायबेज कंपनीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होत असल्याची तक्रार सोसायटीतील रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. यानंतर मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तिथे अनेक नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यामुळे मंडळाने सायबेजला नोटीस बजावून कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस ठाण्यांमध्ये वाढ, आता ‘इतकी’ ठाणी; गुन्हेगारी नियंत्रणात येणार का?

सायबेजकडून खोदकाम करताना स्फोटकांचा वापर केला जात आहे. याबाबत कंपनीने ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. प्रकल्पाच्या ठिकाणी खोदकाम सुरू असून, त्यातून उडणारी धूळ आणि निर्माण होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना होत आहे. याचबरोबर बांधकाम प्रकल्पाच्या भोवताली संरक्षण भिंत उभारण्यात आलेली नाही. बांधकामाच्या ठिकाणी खोदकाम करताना जमिनीतून निघणारे पाणी शेजारील नाल्यात सोडले जात आहे, असे नोटिशीत म्हटले आहे.

पर्यावरण नियम उल्लंघन प्रकरणी सायबेज कंपनीला नोटीस बजाविण्यात आली आहे. कंपनीची बँक हमी जप्त का करू नये अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यास कंपनीला सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. – जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

हेही वाचा : पिंपरी : प्रशासकीय राजवटीत विकासकामे सुसाट; दसऱ्यादिवशीही स्थायीची बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राविना सायबेज कंपनीकडून बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याचबरोबर ध्वनिप्रदूषण आणि हवा प्रदूषण होत आहे. – मुनीर वस्तानी, रहिवासी, कुमार कृती सोसायटी, वडगावशेरी