पुणे : दुबईला वाढदिवस साजरा केला नाही, तसेच विवाहाच्या वाढदिवसाला भेटवस्तू न दिल्याने पतीच्या चेहऱ्यावर ठोसा मारून खून करणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी रेणुका निखिल खन्ना (वय ३८) हिला अटक करण्यात आली आहे. निखिल पुष्कराज खन्ना (वय ३६) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत निखिलचे वडील डॉ. पुष्कराज खन्ना यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. निखिल आणि रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. रेणुका मूळची राजस्थानची आहे. ती पतीला व्यवसायात मदत करत होती. सप्टेंबर महिन्यात रेणुकाचा वाढदिवस होता. तिला दुबईला वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होती. पती तिला दुबईला घेऊन गेला नसल्याने ती रागावली होती, तसेच ५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या विवाहाचा वाढदिवस होता. पतीने मनासारखी भेटवस्तू न दिल्याने ती रागावली होती.

हेही वाचा : जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा २६ मे रोजी, २१ एप्रिलपासून नोंदणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेणुकाला डिसेंबर महिन्यात भावाच्या मुलीच्या वाढदिवसासाठी दिल्लीला जायचे होते. या कारणावरून खन्ना दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. शुक्रवारी दुपारी रेणुका आणि निखिल यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात रेणुकाने पती निखिल यांच्या तोंडावर ठोसा मारला. ठोसा मारल्यानंतर निखिल बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रेणुकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पतीच्या खून प्रकरणात रेणुकाला अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रेणुकाला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत. निखिल जमीन खरेदी-विक्री करायचे, तसेच ते बांधकाम व्यावसायिक होते. वानवडी भागातील उच्चभ्रू सोसायटीत खन्ना दाम्पत्य, सासू-सासऱ्यांसह राहत होते. कौटुंबिक वादातून निखिल यांना पत्नीने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच सोसायटीतील रहिवाशांना धक्का बसला.