पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह दिले आहे. या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा, यासाठी पक्षाच्या वतीने या चिन्हाचे अनावरण रायगड किल्ल्यावर करण्यात आले. त्यासाठी शरद पवार यांच्या पक्षातील सर्व नेते जातीने हजर होते. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांचे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याची भूमिका घेतली. पक्षचिन्ह अनावरणाच्या कार्यक्रमासाठी रायगडकडे ते रवाना होण्यापूर्वी वाट वाकडी करून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी सकाळी व्हीव्हीआयपी सक्रिट हाऊस (शासकीय विश्रामगृह) येथे भेट घेतली. ही भेट बंद दाराआड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

हेही वाचा : “बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत होणार?” संजय काकडेंचं वक्तव्य; मतांचं गणित मांडत सांगितलं कोण जिंकणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून बैठकांचा झपाटा लावला होता. त्यांचे शनिवारी दिवसभर पक्षाचे विविध कार्यक्रम आहेत. त्याकरिता त्यांचे सात वाजण्यापूर्वीच सक्रिट हाऊस येथे आगमन झाले. त्यानंतर काही वेळाने माजी मंत्री टोपे तेथे पोहोचले आणि त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट बंद दाराआड झाली. काही वेळानंतर टोपे बाहेर पडले, तेव्हा त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आणि त्यांनी रायगड किल्ल्याकडे प्रयाण केले. त्यानंतर काही वेळाने आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील सक्रिट हाऊस येथे पोहोचल्या. मात्र, उन्हाळ्यातील पाण्याच्या नियोजनाची बैठक असल्याने रोहित आणि मी बैठकीला हजेरी लावण्यासाठी आलो होतो. अजित पवार हे उपमुख्यमंत्री असल्याने काही कामानिमित्त टोपे आणि त्यांची भेट झाली असण्याची शक्यता आहे, असे सुळे यांनी सांगितले. सर्व बैठका उरकून उपमुख्यमंत्री पवार हे देखील बाहेर पडले आणि त्यांनी देखील काहीही बोलण्यास नकार दिला. टोपे आणि पवार यांच्या भेटीचा तपशील गुलदस्त्यातच राहीला.