पुणे : ओबीसीच्या आरक्षणासाठी महापालिका निवडणुका स्थगित करून काही ठोस होणार असेल, तरच ते योग्य होईल. मात्र त्या नावाखाली महापालिकांवर प्रशासक नियुक्त करून कारभार हाती घेणे योग्य नाही, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. आपापले पैसे कमवा आणि दुकाने चालवा, असेच धोरण राज्य सरकारने हाती घेतले आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका के ली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाध्यक्षांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, पक्षाचे नेते बाबू वागसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी निवडणुका पुढे ढकलण्यास राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. मात्र त्या नावाखाली काही काळेबेरे होत असेल तर ते योग्य नाही. ओबीसींचा विषय पुढे करून सरकारचे सर्व उद्योगधंदे सुरू आहेत, असे होऊ नये. सरकारकडे सर्व यंत्रणा आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची निश्चित आकडेवारी (इम्पिरिकल डाटा) सहज उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट के ले.
दहीहंडी, गणेशोत्सवावर असलेल्या बंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवरही त्यांनी या वेळी टीका के ली. ते म्हणाले,की सरकार आणि पक्षांचे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत. या कार्यक्रमांना गर्दी होत आहे. मात्र सरकारला सणाच्या कालावधीतील गर्दी नको आहे.