लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा घोषित करून निधीची पूर्तता करावी. चापेकर वाड्याचा तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करावा. त्यानुसार विकास करण्याची मागणी आमदार अश्विनी जगताप यांनी गुरुवारी विधानसभेत केली. विधानसभेत सन २०२३ -२४ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेत आमदार अश्विनी जगताप यांनी भाग घेतला.

चिंचवड मतदारसंघातील पवना नदीच्या तीरावरील महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिर हे पुरातन, जागृत देवस्थान आहे. मोरया गोसावी यांनी योगमार्गाने संजीवन समाधी घेतली. याला ४६० वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्यभरातून व शहरातील लाखो भाविक श्रीमन् महासाधू मोरया गोसावी पुण्यतिथी उत्सवाला व दरमहा चतुर्थीला मोठ्या प्रमाणावर देवदर्शनासाठी येतात.

आणखी वाचा- राज्यात मालमत्ता खरेदी-विक्री जोरात; मुद्रांक शुल्कापोटी तब्बल ३८ हजार कोटींचा महसूल

मोरया गोसावी मंदिर देवस्थान व मंगलमूर्तीवाडा परिसर सुशोभीकरण करणे, पादुका मंदिर, सभामंडप, संरक्षक भिंत उभारणे, मुख्य प्रवेशद्वार जतन-संवर्धन व दर्जा वाढ करणे इत्यादी कामांकरिता शासनाच्या पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत श्री मोरया गोसावी मंदिर परिसराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा घोषित करून निधीची पूर्तता करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वातंत्र्यलढ्यात एकाच कुटुंबातील तीन भावंडांनी दिलेले बलिदान संपूर्ण देशामध्ये एकमेव स्फूर्तिदायक उदाहरण असलेले क्रांतिवीर चापेकर बंधूंचा जन्म, बालपण व शिक्षण हे चिंचवडच्या ऐतिहासिक भूमीत झालेले आहे. चापेकर वाड्याला हजारो देशभक्त व पर्यटक भेट देतात. श्रीक्षेत्र चिंचवड क्षेत्राचा विकास व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या सहकार्याची व निधीची नितांत आवश्यकता आहे.

चिंचवड या धार्मिक व ऐतिहासिक स्थळाचा शासनाच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करून विकास करण्यात यावा, अशी मागणीही जगताप यांनी केली.