पुणे : मुंबई-पुणे-बंगळुुरू महामार्ग गेल्या काही वर्षांत वाढते अपघात आणि त्यात होणाऱ्या जीवितहानीमुळे चर्चेत आहे. त्यातही भरधाव वेगात धावणाऱ्या कंटेनर, डम्पर, ट्रक अशा अवजड वाहनांमुळे या मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक ठरत असल्याचे गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातातून स्पष्ट झाले. गंभीर बाब म्हणजे महामार्गावरील नवले पूल परिसरात गेल्या पाच वर्षांत प्राणांतिक, गंभीर, किरकोळ असे २५७ अपघात झाले. त्यामध्ये ११५ जणांना प्राण गमवावा लागला आहे.

एकेकाळी शहराच्या बाहेर असलेल्या मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसराचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. नऱ्हे, आंबेगाव, वडगाव बुद्रुक, वारजे, बालेवाडी, चांदणी चौक, पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, वाकड, ताथवडे या उपनगरात अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहिले. परिणामी शहराबाहेरून जाणाऱ्या या मार्गालगतच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच मुंबईहून कोल्हापूर, सातारा, सांगली, बंगळुरू तसेच दक्षिणेकडील राज्यांत जाणाऱ्या वाहनांकडून या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. कंटेनर, डम्पर, ट्रक अशी अवजड वाहने या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.

गेल्या पाच वर्षांत बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा, दरीपूल, स्वामी नारायण मंदिर, नऱ्हे ते वडगाव बुद्रुक परिसरात ९५ गंभीर अपघात झाले, त्यात ११५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. तर नवले पूल परिसरात गेल्या पाच वर्षांत ७२ गंभीर अपघात झाले, त्यात ९४ जण जखमी झाले आहे. याबरोबरच गेल्या पाच वर्षांत प्राणांतिक, गंभीर, किरकोळ असे एकूण मिळून २५७ अपघातांची नोंद झाली आहे. गुरुवारच्या अपघातानंतर या मार्गावर वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या उपाययोजनाही फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

वर्दळीचा परिसर

परगावी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस, तसेच एसटी बसचे थांबे नवले पूल परिसरात आहेत. या भागातील सेवा रस्त्यांवरील थांब्यांवरून प्रवासी मोठ्या संख्येने परगावी जातात. सणासुदीच्या काळात बाह्यवळण मार्गावर वर्दळ वाढते.

बाह्यवळण मार्गावरील दरीपूल ते नवले पुलावर तीव्र उतार आहे. डम्पर, कंटेनर, ट्रकचालकांच्या बेदरकारपणामुळे नवले पूल परिसरात गंभीर अपघात घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वाहनांचा वेग कमी करण्यासाठी दरीपूल ते नवले पूल दरम्यान गतिरोधक पट्टीका (रम्बलिंग स्ट्रीप) लावल्या, तसेच विविध उपाययोजनाही केल्या, परंतु अवजड वाहनचालक नियम धुडकावून भरधाव वेगाने जातात.

नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघात

वर्ष अपघात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या

२०२१ २१ २८

२०२२ २५ २७

२०२३ २२ ३१

२०२४ १८ २०

२०२५ ९ ९ (१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५)

नवले पूल परिसरातील गंभीर अपघात

वर्ष अपघात गंभीर जखमींची संख्या

२०२१ १८ २४

२०२२ २६ ३७

२०२३ ९ १२

२०२४ १३ १५

२०२५ ६ ६ (१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५)