देशातील काही राज्यांमध्ये बालकांना संसर्ग करणाऱ्या टोमॅटो फ्लूच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या हँड, फूट, माऊथ डिसिजच्या (एचएफएमडी) रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. हा संसर्ग बालकांमध्ये सर्वसाधारणपणे आढळून येणारा आहे, त्यामुळे काळजीचे कारण नाही, मात्र गाफिल न राहण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

हँड, फूट, माऊथ हा संसर्गजन्य आजार कॉक्सकी विषाणुमुळे होतो. या आजाराने ग्रासलेली मुले बाह्यरुग्ण विभागात येण्याचे प्रमाण वाढल्याचे मत डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पाच वर्षांखालील वयाच्या लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असले तरी इतर वयातील मुलांमध्येही मोठ्या मुलांनाही याचा त्रास होऊ शकतो. आजाराचा संसर्ग झालेल्या मुलांच्या लाळेतून, शिंकांमधून उडालेल्या तुषारातून त्याचे संक्रमण होते. त्यामुळे हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता आणि संसर्ग झालेल्या मुलांना निरोगी मुलांमध्ये मिसळू न देणे उपयुक्त असल्याचा सल्ला डॉक्टर देतात.

हेही वाचा : पुणे : जोरदार पावसामुळे १४ ठिकाणी झाडे कोसळली

मदरहूड रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल पालवे म्हणाले, हँड फूट माऊथ हा मुलांमध्ये नियमितपणे आढळणारा आजार आहे. यंदा मंकीपॉक्स आजाराच्या भीतीने पालक तातडीने डॉक्टरांला सल्ला घेण्यासाठी येत आहेत. ताप, खोकला, घसा खवखवणे, अस्वस्थता, भूक न लागणे, तोंड, तळवे, हात, पायांवर लाल पुरळ दिसल्यास पालकांनी दुर्लक्ष न करता मुलांना डॉक्टरांकडे दाखवावे. आठवड्याभरात मुले संपूर्ण बरी होतात, त्यामुळे घाबरून जाऊ नये, असेही डॉ. पालवे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३१ हजार महिलांकडून अथर्वशीर्ष पठण; पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे डॉ. संजय नगरकर म्हणाले, या आजारामध्ये अंगावर लाल पुरळ येण्याबरोबरच मुलांना ताप येतो. उलट्या आणि जुलाबांमुळे शरीरातील पाण्याची पातळी चिंताजनक परिस्थितीत कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तशी लक्षणे दिसल्यास मुलांच्या पोटात पुरेसे पाणी जात आहे याची खबरदारी घ्यावी. बहुतांश मुलांचा हा आजार आपोआप बरा होतो, मात्र काही मुलांना अंगावरील पुरळ वेदनादायी असल्यास वेदनाशामक औषध देण्याची गरज भासते, असेही डॉ. नगरकर यांनी स्पष्ट केले.

अशी काळजी घ्या

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
  • वारंवार साबण लावून हात धुवा.
  • मुलांचे पांघरुण, पाणी पिण्याचे भांडे स्वतंत्र ठेवा.
  • वारंवार स्पर्श झालेले पृष्ठभाग निर्जंतुक करा.
  • आजारी मुलांचे निरोगी मुलांमध्ये मिसळणे, खेळण्यासाठी जाणे टाळा.