लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आवक कमी झाल्याने फळभाज्यांच्या पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. त्यामुळे खिशावर आर्थिक ताण येणार असल्याचे दिसून येत आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (७ एप्रिल) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून ८ ते १० टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात, कर्नाटकातून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो शेवगा, राजस्थानातून २ ट्रक गाजर, हिमाचल प्रदेशातून ५ टेम्पो मटार, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-“भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचणारच…”, खेकडा प्रकरणावर रोहित पवार यांचे भाष्य

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कांदा १०० ट्रक तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून ३० ट्रक बटाटा अशी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

पालेभाज्यांच्या दरातही वाढ

करडई, अंबाडी, मुळा, चवळईच्या दरात वाढ झाली असून, शेपुच्या दरात घट झाली आहे. कोथिंबिर, मेथी, कांदापात, चाकवत, पुदिना, राजगिरा, चुका, पालकाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर दीड लाख जुडी, मेथीच्या ५० ते ६० हजार जुडी अशी आवक झाली.