पुणे: पेट्रोल, डिझेलचे दर वाढूनही मागील सहा वर्षांपासून पेट्रोल पंपचालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाही. अपूर्व चंद्रा समितीने पंपचालकांच्या कमिशनचा दर सहा महिन्यांनी आढावा घेण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. तरीही पेट्रोलिअम कंपन्यांकडून २०१७ पासून पेट्रोल पंपचालकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्याचा आर्थिक फटका पंपचालकांना बसत आहे.

पेट्रोल पंपचालकांनी पेट्रोलिअम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलच्या विक्रीवर प्रतिलिटर कमिशन मिळते. हे कमिशन प्रतिलिटर पेट्रोलसाठी ३.३० रुपये आणि डिझेलसाठी २.२० रुपये आहे. हे कमिशन २०१७ पासून तेवढेच आहे. त्या वेळी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७४ रुपये, तर डिझेलचा दर ५९ रुपये होता. आता पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६ रुपये आणि डिझेलचा दर ९३ रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली असताना पंपचालकांचा कमिशनमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. देशभरात ८३ हजार पेट्रोल पंप आहेत. पुणे जिल्ह्याचा विचार करता सुमारे ९०० पेट्रोल पंप आहेत.

हेही वाचा… पिंपरी महापालिकेच्या नोकर भरतीच्या निकालाला अखेर मुहूर्त

पेट्रोल डीलर असोसिएशनच्या माहितीनुसार, पेट्रोल पंपचालकांच्या खर्चात महागाईमुळे सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलिअम कंपन्यांकडून मिळणाऱ्या कमिशनपैकी प्रतिलिटर ४० पैसे पंपचालकांना पुन्हा कंपन्यांना द्यावे लागतात. महागाईचा दर विचारात घेऊन दर सहा महिन्यांनी कमिशनचा आढावा घेण्याची शिफारस अपूर्व चंद्रा समितीने केली होती. प्रत्यक्षात २०१७ पासून कमिशन वाढविण्यात आले नसून, प्रत्येक पंपचालकाला महिन्याला सरासरी पाच लाख रुपयांचा फटका बसत आहे. संघटनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन सरकारकडे याबाबत पाठपुरावा करण्याची मागणीही केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महागाई वाढल्याने पेट्रोल पंपचालकांच्या खर्चात वाढ झालेली आहे. मागील काही काळात पेट्रोल, डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढूनही आमचे कमिशन तेवढेच ठेवण्यात आले आहे. याचा फटका पंपचालकांना बसत असल्याने सरकारने तातडीने यात लक्ष घालून आमची समस्या सोडवावी. – धुव्र रुपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन