इंदापूर : इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाची पारंपरिक यात्रा यंदा उत्साहात झाली. राज्यासह कर्नाटकातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत तीन दिवस ही यात्रा रंगली. हजारो भाविकांनी श्रद्धेने बाबीर देवाचे दर्शन घेतले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने, माजी आमदार यशवंत माने यांनीही यात्रेला उपस्थित राहून दर्शन घेतले.

रुईची बाबीर देव यात्रा ही राज्यातील मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते. धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक परंपरेचा संगम घडवणारी ही यात्रा वर्षानुवर्षे भाविकांना आकर्षित करत आहे. यावर्षीही तीन दिवस गाव परिसरात उत्साह होता. या यात्रेचे गजी ढोल नृत्यस्पर्धा यंदाचे मुख्य आकर्षण ठरली. अमोल भिसे आणि मित्र परिवाराच्या पुढाकारातून गेली २५ वर्षे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामध्ये राज्यभरातील गजी ढोल संघांनी सहभाग नोंदवून कला सादर केली.

या यात्रेचे श्री बाबीरदेव यात्रा कमिटीसह रुई ग्रामपंचायत; तसेच जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रवीण माने, आकाश कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. इंदापूर, वालचंदनगर आणि बारामती वाहतूक शाखेने यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त ठेवला होता.