पुणे : भारत-उझबेकिस्तान यांचा सहावा संयुक्त लष्करी सराव औंध येथील लष्करी तळावरील परकीय प्रशिक्षण केंद्रात बुधवारी सुरू झाला. संयुक्त प्रशिक्षणाला चालना आणि निमशहरी भागात दहशतवादविरोधी कारवायांतील सर्वोत्तम पद्धतींची देवाण-घेवाण सुलभ करण्याचा या सरावाचा उद्देश आहे.
‘दुस्तलिक’ (उझबेक भाषेत ‘मैत्री’) असे या सरावाचे नाव आहे. उझबेकिस्तानच्या वाढत्या संरक्षण गरजांच्या पार्श्वभूमीवर आणि भारताकडून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्राच्या स्वदेशीकरणासाठी परस्परपूरक ठरत असल्यामुळे हा सराव महत्त्वाचा ठरतो. भारतीय लष्करी तुकडीत ६० जवानांचा समावेश असून त्यात जाट रेजिमेंटच्या बटालियनचे जवान आणि भारतीय हवाई दलाच्या गरुड (विशेष दल)चे सदस्य सहभागी आहेत.
उझबेकिस्तानच्या लष्करातील अधिकारी आणि जवान त्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत. या सरावात ठरावीक भूभाग दहशतवाद्यांनी काबीज केल्याच्या परिस्थितीत उत्तर देण्यावर भर दिला जाणार आहे. बटालियन पातळीवर संयुक्त कारवायांसाठी संयुक्त ऑपरेशन्स सेंटरची स्थापना, लोकसंख्येवर नियंत्रण, छापे, शोधमोहीम आणि नष्ट करण्याच्या कारवाया तसेच हवाई शक्तीचा वापर करून दहशतवाद्यांचा बंदोबस्त अशा मोहिमांचा समावेश असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘संयुक्त लष्करी सराव प्रादेशिक सुरक्षेला चालना देण्यासह सैन्यांतील सहकार्य वाढवण्याचे आणि एकमेकांशी मैत्रीचे संबंध दृढ होण्यासाठीचे उत्तम उदाहरण आहे,’ असे औंध लष्करी तळाचे ब्रिगेड कमांडर ब्रिगेडियर एस. तलुजा यांनी सांगितले. तर निमशहरी भागात दहशतवादविरोधी कारवायांशी महत्त्वाच्या मोहिमांवर एकत्रित काम करण्याची संधी मोठी आहे. विविध प्रकारच्या सशस्त्र दलांचा वापर करून या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण या सरावाच्या माध्यमातून होईल, असे उझबेकिस्तानचे कर्नल जसबारोव थोइर एर्गाशोविच यांनी नमूद केले.