पुणे : भारतातील निम्म्याहून अधिक जेन-झी महिलांना प्रजनन क्षमता तपासणी आवश्यक वाटते. याचबरोबर पस्तीशीनंतर प्रजनन क्षमता लक्षणीयरीत्या कमी होत असल्याने २८ ते ३२ वयादरम्यान प्रसूती करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यांना प्रजनन आरोग्य, मूल होण्यासाठी योग्य कालावधी आणि प्रजनन पर्यायांबाबत माहिती असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
मदरहूड हॉस्पिटल्स आणि नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीने विविध शहरांमधील जेन-झी पिढीमध्ये त्यांच्या प्रजनन आरोग्याबाबत नुकतेच सर्वेक्षण केले. वेगवेगळी व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या २३ ते ३० वयोगटातील दोनशेहून अधिक जेन-झी तरुणी या सर्वेक्षणात सहभागी झाल्या होत्या. या सर्वेक्षणानुसार, २८ ते ३२ या वयोगटातील ४० टक्के तरुणी गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत आहेत. वयाच्या पस्तीशीच्या आत गर्भधारणा होणे गरजेचे असल्याचे मत २५ टक्के तरुणींनी म्हटले आहे. प्रजनन क्षमता तपासणीच्या अँटी-मुलेरियन हार्मोन (एमएमएच) चाचणीबाबत ३५ टक्के तरुणींना माहिती आहे. मात्र, ही चाचणी करणाऱ्या तरुणींची संख्या केवळ १० टक्के आहे. अंडाशयात असलेले अँटी-मुलेरियन हार्मोन हे महिलांमध्ये स्त्रीबीजांचे प्रमाण दर्शविते. हे एका साध्या रक्त चाचणीद्वारे समजू शकते.
एग फ्रीजिंग म्हणजेच स्त्रीबीजे गोठवून ठेवण्याबद्दल ५६ टक्के तरुणींनी ऐकले आहे. परंतु, त्याबद्दल त्यांना पुरेशी माहिती नाही. याचवेळी आर्थिक स्थिरता, करिअर, जगाचा प्रवास करणे आणि योग्य जोडीदार न सापडणे यासारख्या कारणांमुळे स्त्रीबीजे गोठवून ठेवण्याच्या पर्यायाचा विचार करणाऱ्या तरुणींची संख्या १० टक्के आहे. समाज माध्यमांवर लैंगिक आरोग्य, मासिक पाळीचे आरोग्य आणि स्त्रीरोग समस्या यासारख्या विषयांवर चर्चा होत असते. हाच अनेक तरुणींसाठी माहितीचा मुख्य स्रोत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
पीसीओएस, थायरॉईड आणि एंडोमेट्रिओसिस सारख्या आजारांचे २० टक्के महिलांमध्ये निदान झाले आहे आणि तरीही त्यांना वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता वाटत नाही. हृदयाच्या आरोग्याप्रमाणेच प्रजनन आरोग्यातही जीवनशैली खूप महत्त्वाची भूमिका बजावते. स्त्रीबीजे गोठविणे हा एक व्यवहार्य पर्याय असला तरी, तो कधी आणि का विचारात घ्यावा याबाबत आजही पुरेशी जागरूकता दिसत नाही. – डॉ. शर्वरी मुंढे, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, मदरहूड हॉस्पिटल्स
प्रजननक्षमतेत घट हळूहळू होते, परंतु सर्वांत लक्षणीय घट ही पस्तीशीनंतर होते. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी म्हणून नियमित प्रजनन चाचणी करून, तरुणी प्रजनन आरोग्य चांगले राखू शकतात. स्त्रीबीजे गोठविण्याचे योग्य वय जाणून घेणे महत्त्वाचे आहे.– डॉ. रश्मी निफाडकर, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी