पुणे : वीजचोरीचे प्रकार काही नवीन नाहीत. आकडे टाकून वीज चोरणे हेही अनेकदा घडते. पुण्यातील एका औद्योगिक ग्राहकाने मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चक्क रिमोटद्वारे वीजचोरी केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
नुकतीच पुण्यातील भोसरी एमआयडीसीमध्ये वीजचोरीची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून ही चोरी करण्यात येत होती. अखेर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) अधिकाऱ्यांनी कारवाई करून या औद्योगिक ग्राहकावर कारवाई केली आहे. कंपनीच्या मालकाकडून तब्बल १९ लाख १९ हजार ३६३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
नेमके काय होत होते?
भोसरी एमआयडीसीमध्ये एका औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटचा वापर करून ही वीजचोरी करण्यात येत होती. या ग्राहकाकडून महावितरणने १९ लाख १९ हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच, वीजचोरीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
कशी झाली कारवाई?
महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी वीजवितरण हानी कमी करण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार महावितरण पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी वीजचोरीविरोधात मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. गणेशखिंड विभागाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड आणि भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी वीजचोरी शोधण्यासाठी खास पथक तयार केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता गजानन झापे, वीज कर्मचारी हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड, महेश वाघमारे यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये तपासणी सुरू केली. तेव्हा एका औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटद्वारे वीजचोरी केली जात असल्याचे आढळले.
चोरी किती, दंड किती?
वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून, या ग्राहकाला मागील दोन वर्षांमध्ये केलेल्या ७७,१७० युनिटच्या वीजचोरीसाठी १९ लाख १९ हजार ३६३ रुपयांचा दंड आणि २ लाख ३० हजारांचे तडजोड आकाराचे देयक देत दंड वसूल करण्यात आला आहे.
रिमोटद्वारे वीजचोरीचा नवा प्रकार
भोसरी एमआयडीसीमध्ये एका औद्योगिक ग्राहकाकडून वीजचोरी करण्यात येत असल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली. या वीज ग्राहकाने कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून वीजचोरी करण्यासाठी ‘रिमोट’चा वापर केला होता. रिमोटच्या मदतीने त्याने युनिटमध्ये फेरफार केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.