पुणे : संक्रांतीसाठी मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजारात चिक्की गुळाची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. चिक्की गुळाला गृहिणी तसेच मिठाई विक्रेत्यांकडून चांगली मागणी आहे.

संक्रांत येत्या रविवारी (१५ जानेवारी) असून गेल्या आठवड्यापासून चिक्की गुळाची बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. संक्रांतीला तिळाचे लाडू, तीळ वडी, गूळपट्टी तयार केली जाते. त्यासाठी चिक्की गुळाचा वापर केला जातो. कराड, सांगली, कोल्हापूर भागातील गुऱ्हाळातून चिक्की गूळ तयार केला जातो. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरातील गुऱ्हाळात चिक्की गूळ तयार केला जातो. डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात चिक्की गूळ तयार केला जातो. त्यानंतर गुऱ्हाळातून चिक्की गूळ बाजारात विक्रीस पाठविला जातो, असे मार्केट यार्डातील गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.

हेही वाचा – तरुण असे का वागतात? पुण्यात कोयता गॅंगच्या कहराच्या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञांनी दिली ‘ही’ माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्केट यार्डातील भुसार बाजारात कराड, सांगली, कोल्हापूर तसेच केडगाव भागातून चिक्की गुळाच्या ५०० खोक्यांची आवक होत आहे. अर्धा, पाऊण, एक किलो वजनाचा चिक्की गूळ एका खोक्यात असतो, तसेच चिक्की गुळाच्या दहा, तीस किलोच्या ५०० ते ७०० ढेपांची आवक दररोज भुसार बाजारात होत आहे. गुळाचे दर स्थिर आहेत. किरकोळ बाजारात एक किलो चिक्की गुळाचे दर ६० ते ६५ रुपये किलो दरम्यान आहे. साध्या गुळाला मागणी चांगली असून एक किलो साध्या गुळाचे दर ४० ते ६० रुपये किलो दरम्यान आहेत, असे बोथरा यांनी सांगितले.

हेही वाचा – मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे सेवन का करतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण


चिक्की गुळाचे वैशिष्ट्य

चिक्की गूळ चिकट असतो. चिकटपणामुळे तीळ लाडू, गूळपट्टी, तीळ वडी चांगली होत असल्याने गृहिणींकडून चिक्की गुळाला चांगली मागणी असते.