Narayana Murthy on Climate Change : तापमान बदलाच्या समस्येमुळे भविष्यात देशातील काही राज्यांमधील ग्रामीण भाग राहण्यायोग्य राहणार नाहीत. यामुळे पुढील काळात या राज्यांतून मोठे सामूहिक स्थलांतर बंगळुरू आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये होईल, असा धोक्याचा इशारा इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी शुक्रवारी दिला. तापमान बदलाबाबत वेळीच पावले उचलण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

जे.पी. श्रॉफ फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘सस्टेनेबिलिटी क्रूसेडर’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात मूर्ती बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि तरूण उद्योजक आलोक काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, ज्येष्ठ उद्योगपती जमशेद गोदरेज आदी उपस्थित होते.

हेही वाचा : लैंगिक अत्याचार प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा ठपका, शिक्षण संस्थाचालकाला न्यायालयीन कोठडी

यावेळी ‘५एफ वर्ल्ड’चे संस्थापक गणेश नटराजन यांनी मूर्ती यांच्याशी संवाद साधला. तापमान बदलाच्या आव्हानावर बोलताना मूर्ती म्हणाले की, भारत आणि आफ्रिकेतील काही भाग यांना तापमानात वाढीचा मोठा फटका बसणार आहे. यावर आपण नियंत्रण न मिळविल्यास मोठी समस्या निर्माण होईल. पुढील २० ते २५ वर्षांत भारतातील काही भाग राहण्यास योग्य राहणार नाहीत. त्यामुळे देशातील या ग्रामीण भागातून मोठे स्थलांतर शहरांमध्ये होईल. त्यात बंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यासारख्या शहरांचा समावेश असेल.

देशातील काही शहरांचा उल्लेख मी यासाठी करीत आहे की त्यांची सध्याची अवस्था पाहावी लागेल. ही शहरे राहण्यासाठी अतिशय कठीण बनली. ती प्रवासासाठी अतिशय अवघड बनली आहेत आणि प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही शहरे राहण्यायोग्य नसण्याच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्राला धोरणकर्त्यांसोबत तापमान बदलाचा सामना करून भविष्यातील मोठे स्थलांतर थांबविण्यासाठी पावले उचलावी लागतील, असे मूर्ती यांनी नमूद केले.

हेही वाचा : पिंपरी : बिल्डरांना ‘या’ वेळेत बांधकाम करता येणार नाही; महापालिकेकडून नियमावली जारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणांनी ऐषारामी जगण्यातून बाहेर यावे

आजच्या तरूण पिढीने ऐषारामी जगण्यातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे. त्यांनी देश आणि समाजासाठी काहीतरी देणे लागतो, या भावनेतून काम करावे. देशातील वंचित घटकांबद्दल आपण चिंता दाखवायला हवी अन्यथा आपण केवळ प्राणी ठरू. या देशाचा चांगला नागरिक बनणे आणि देशात सुधारणा घडविणे हा खरा राष्ट्रवाद आहे. केवळ देशाचा झेंडा लपेटून खरे राष्ट्रवादी होता येत नाही, असा मोलाचा सल्लाही मूर्ती यांनी तरूणाईला दिला.