पुणे जिल्ह्यातील अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावी आणि बारावीचा निकाल शंभर टक्के लागणे, विद्यार्थ्यांचे गुण वाढण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत ८० टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ७५ दिवसांचा कृति कार्यक्रम राबवला जाणार आहे.
हेही वाचा >>>खळबळजनक! चाकणमध्ये डोक्यात दगड घालून महिलेची हत्या
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या बाबतचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यात १ हजार ६५८ अनुदानित आणि अंशत: अनुदानित विद्यालये आहेत. २०२१-२२मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या १ लाख ३६ हजार २७४ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३० हजार ३८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर बारावीची परीक्षा दिलेल्या १ लाख २४ हजार ७२१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १३ हजार ९७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र ६० शाळांचा आणि १९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल ८० टक्क्यांहून कमी लागला. या पार्श्वभूमीवर एकूण निकाल आणि विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रमाद्वारे उपाययोजना करण्याबाबत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे: नवले पुलाजवळील सेवा रस्त्याचे काम अपूर्ण; सुप्रिया सुळे यांच्याकडून अपघातग्रस्त भागाची पाहणी
या अंतर्गत दहावी आणि बारावीच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, अर्ज भरलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणे, निकालात पहिली श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे गुण किमान पाच टक्क्यांनी वाढणे, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण पाच टक्क्यांनी वाढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.