समाजमाध्यमाची शक्ती मोठी असल्याचे मान्य करतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठासारख्या सार्वजनिक संस्थेने ट्विटरसारख्या समाजमाध्यमावर जाण्याच्या फंदात पडू नये अशी भूमिका मराठी सोशल मीडिया संमेलनाच्या व्यासपीठावरून शुक्रवारी मांडली.

डिमिप्रेमी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि मिरॅकल इव्हेंट्स यांच्यातर्फे आयोजित मराठी सोशल मीडिया संमेलनाच्या उद्घाटन सत्रात डॉ. करमळकर बोलत होते. मगरपट्टा सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ग्यान कीचे प्रदीप लोखंडे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस, युट्युबर मधुरी बाचल, सुमती धामणे, आयोजक समीर आठल्ये आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. करमळकर म्हणाले, विद्यापीठ ट्विटरसारख्या समाजमाध्यमात कार्यरत नाही. पण साडेसात लाख विद्यार्थ्यांशी जोडलेले आहे. समाजाभिमुख असण्याचा विद्यापीठाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. समाजमाध्यमाची शक्ती आणि परिणामकारकता मोठी आहे. समाजमाध्यमाचा वापर करून गुन्हे घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समाजमाध्यमाचा वापर जागरुकतेने केला पाहिजे. गुगल किंवा समाजमाध्यमातील सर्व माहिती खरी असते असे नाही. त्यामुळे माहिती तपासून घेणे गरजेचे झाले आहे. 

समाजमाध्यमांमुळे आज गाव, शहर असा भेद राहिलेला नाही. कोणत्याही कोपऱ्यातून जगाशी जोडले जाणे शक्य आहे. या माध्यमाचा उपयोग तरुणांनी करून घेतला पाहिजे, असे लोखंडे यांनी सांगितले.